ऊस निर्यातीवर सबसिडी तर ७५ नवे मेडिकल कॉलेज : केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय

prakash javadekar

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच देशात ७५ नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आणि १५ हजार ७०० डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारने आज चार मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर केंद्र सरकारने ६ हजार २६८ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे १० रुपये ३० पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे पैसे थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊसाचे दर प्रमाणबद्ध राहतील आणि शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.

७५ मेडिकल कॉलेज :- आजच्या बैठकीत देशभरात ७५ नवे मेडिकल कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २४ हजार कोटींचा खर्च येणार आहे. तसेच १५ हजार ७०० डॉक्टरांची भरती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

कोळसा खाणीत १०० टक्के एफडीआय :- रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कोळसा खाण क्षेत्रात १०० टक्के एफडीआयच्या गुंतवणुकीचा निर्णयही घेतला आहे. तसेच छोट्या-मोठ्या विविध प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगवर १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रिंट आणि डिजिटल मीडियात २६ टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

Protected Content