Home राजकीय सावदा नगरपालिकेत विषय समित्यांची बिनविरोध निवड; स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रतीक्षा...

सावदा नगरपालिकेत विषय समित्यांची बिनविरोध निवड; स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रतीक्षा भंगाळे


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेत विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया आज शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडली. कोणताही विरोध किंवा वाद न होता सर्व पदांवर एकमताने निर्णय झाल्याने नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला स्थैर्य मिळाले आहे. या प्रक्रियेत स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

नगरपालिकेच्या विशेष बैठकीत विषय समित्यांच्या रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये सौ. रंजना जितेंद्र भारंबे, श्री. पंकज राजाराम येवले, श्री. विशाल प्रेमचंद तायडे तसेच श्री. सुनिल नेमीदास जंगले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. शहरातील आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांशी निगडित प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर सौ. प्रतीक्षा भंगाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत नगरपालिकेतील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल, तसेच सावदा शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्व नगरसेवक, अधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने काम केले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या बिनविरोध निवडीबद्दल नगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सौ. प्रतीक्षा भंगाळे यांचे अभिनंदन केले. नव्या समितीच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound