पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी आ. गिरीश महाजन यांच्या निधीतून भव्य अभ्यासिका उभारण्यात येत असून याचे भूमिपुजन करण्यात आले.
पहूर पेठ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेजवळ सदर अभ्यासिकेचे भूमिपूजन आ. गिरीश महाजन यांच्य हस्ते करण्यात आले. ही अभ्यासिका पहूर पेठ गृप ग्रामपंचायत अंतर्गत गावाच्या इतिहासातील पहिलीच सर्व सुविधायुक्त अभ्यासिका ठरणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच सौ. निता रामेश्वर पाटील यांनी सांगितले. एकावेळेस ५० विद्यार्थी अभ्यासाला बसू शकतील . विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ही अभ्यासिका अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचेही त्या म्हणाल्या .
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. या अनुषंगाने आमदार गिरीश महाजन यांनी त्यांच्या फंडातून १८लाख ३५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. यातून अभ्यासिका उभी राहणार असून त्याचे भूमिपूजन विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या दिवशी झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, माजी उपसरपंच राजू पाटील , पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख,महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष दौलत घोलप,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज जोशी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश पांढरे , पत्रकार रवींद्र घोलप ,भाजप शहराध्यक्ष संदीप बेढे , सामाजिक कार्यकर्ते ललीत लोढा, किरण खैरणार , ईश्वर देशमुख आदी उपस्थित होते. प्रारंभी आमदार गिरीश महाजन यांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले. आभार सरपंच सौ. निता रामेश्वर पाटील यांनी मानले.