जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात शिक्षण विभागातर्फे आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यात विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता शिक्षण विभागाकडून २९ एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. बुधवार, २० एप्रिल रोजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी याबाबतचे आदेश पारित केले असल्याची माहिती जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शिक्षण विभागामार्फत शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. यालाच आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया म्हणतात. आरटीअंतर्गत प्रवेशसाठी जळगाव जिल्ह्यातील एकूण ८ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यात २ हजार ९४० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती तर २ हजार ३९९ जणांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केली होती.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दि.२० एप्रिल २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी, संस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबत शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहाराव्दारे विनंती केली होती. याची दखल घेत शिक्षण विभागाकडून आरटीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे शिक्षण संचालकांचे आदेशही पारीत झाले आहेत. अशी माहिती जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.