जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात फार मोठे आमुलाग्र बदल होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमावर भर देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिश्रम करणे आवश्यक आहे, असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र -कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाला चाळीसगाव येथील नानासाहेब वाय.एस.चव्हाण महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी भेट देवून विभागाविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मानव्यविद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, चाळीसगाव येथील प्रा. आर.पी.निकम, प्रा. रवी चव्हाण, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते. अधिष्ठाता प्रा.डॉ. प्रमोद पवार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणांविषयी सविस्तर माहिती दिली. विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी विद्यापीठ आणि विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश गोसावी व कस्तुरी जगताप हिने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.