पिकविम्यातील निकष कमी करा- शेतकऱ्यांतर्फे राज्य कृषी सचिवांना निवेदन

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा झालेल्या पीकविमा विषयातील अन्यायकारक निकष कमी करून जुन्या पद्धतीने निकष कायम करण्याबाबतचे निवेदन (दि.०९) रोजी जळगाव येथील अजिंठा विश्राम गृहावर आलेल्या राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिले.

येणाऱ्या तीन वर्षासाठी विमा कंपनीचा करार करण्यात आला असून त्यातील कमी तापमान व जास्त तापमान यांचे निकष अत्यंत अन्यायकारक असून त्यात तातडीने बदल करावा.  तसेच या संदर्भातील कृषी विद्यापीठांची शिफारस तपासून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केळी उत्पादकांतर्फे यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे करण्यात आली. 

एकनाथ डवले यांनी निवेदन स्वीकारत या आधी आ.शिरीष चौधरी यांनीही याबाबत भेट घेतली असल्याचे सांगत याबाबत आम्ही राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे दोन वेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. यासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी शिष्टमंडळ आल्यास याबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत केळी उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यासाठी आ.शिरीष चौधरी मुंबईत थांबून असून याबाबत वेळ निश्चीत झाल्यावर पुढील चालना मिळणार असल्याचे समजते.तूर्त पिकबीम काढण्याबाबत शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

यावेळी सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिप सीईओ व्ही एन पाटील,जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर,जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक मधुकर चौधरी हे उपस्थित होते.तर शेतकरी शिष्टमंडळात मुक्ताईनगरचे विनोद तराळ, निंभोऱ्याचे सुनील कोंडे, ऐनपुरचे विकास महाजन, प्रवीण महाजन, बलवाडीचे राहुल पाटील, कठोरा ता.जळगावचे डॉ सत्वशील पाटील यांची उपस्थिती होती.

Protected Content