यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शून्य वर्ष किंवा ई-लर्निंग वर्ष’ म्हणून घोषित करावे; एनएसयूआयची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शासनाने शालेय शिक्षण विभागाचा एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रणाली टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी व पालकांची भावना लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्याकडे यंदाचे वर्ष हे “शून्य शैक्षणिक वर्ष” म्हणून शासनाने घोषित करावे अशी ‘एनएसयूआय’तर्फे मागणी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने शाळा, महाविद्यालये यांची सर्व परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जून महिन्यापासून शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय शिक्षण मंडळाने शाळा सुरू करण्याचा अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन व ऑफलाईनच्या माध्यमातून शाळेचे वर्ग घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या पाल्याची चिंता पालकांना लागून आहे. त्यांचे आरोग्य अबाधित असणेही महत्वाचे आहे. काही पालकांची तर कोरोना भीतीमुळे शाळेत मुलांना पाठविण्यास नकारात्मक भूमिका त्यांची आहे. तर पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तरी चालेल तरी आम्ही मुलांना शाळे पाठविणार नाही असा पावित्रा पालकांनी घेतला आहे.

जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे, यंदाचे वर्ष हे “शून्य शैक्षणिक वर्ष” म्हणून शासनाने घोषित करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही व पालकांना फी माफी मुळे आर्थिक दिलासा मिळेल व शैक्षणिक संस्थेच्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य जोपासले जाईल.

Protected Content