सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील विद्यार्थी विकास विभागाच्या ‘युवतीसभा’ अंतर्गत आयोजित पाच दिवसीय ‘मिशन साहसी अभियान’ अंतर्गत आज तिसऱ्या दिवशी यावल तालुक्यातील मोर धरण आणि सातपुडा पर्वतावर विद्यार्थिनींनी ट्रेकिंगचा आनंद घेतला. या उपक्रमात ४० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत ट्रॅकिंगचा व क्षेत्रभेटी चा आनंद घेतला.
प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनी विद्यार्थिनींच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अशा साहसी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींसाठी शारीरिक ऊर्जेत वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. शिक्षणासोबतच शारीरिक व मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमासाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री पाटील, सहायक अधिकारी प्रा. अचल भोगे, डॉ.ताराचंद सावसाकडे, डॉ.डी.एल. सुर्यवंशी, डॉ.सविता वाघमारे,डॉ.सरला तडवी, प्रा.नाहिदा कुरेशी, डॉ.पल्लवी भंगाळे, प्रा.पूजा महाजन आणि इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. मुलींनी ट्रेकिंगदरम्यान सहकार्य, धैर्य, आणि साहसाचा परिचय घडवून दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मनिर्भरता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.