नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवळाली कॅम्प भागातील बार्न्स स्कूल आणि महाविद्यालयात जलतरण स्पर्धेवेळी शार्दुल पोळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मूळचा पुण्यातील विश्रामवाडीचा असणारा शार्दुल या महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. देवळाली कॅम्प भागातील नामांकित बार्न्स स्कूल व महाविद्यालयाच्या वसतिगृहात शार्दुल वास्तव्यास होता. महाविद्यालयात मंगळवारी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर पुन्हा स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी शार्दुलने पाण्यात उडी मारली. काही वेळ होऊनही तो पुन्हा वर आला नाही. हे लक्षात येताच त्या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याने तलावात उडी मारून शार्दुलला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडातून शरीरात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने एका पालकाच्या वाहनातून शार्दुलला लॅम रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर मनीषा बोथरा यांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.