बुलडाणा – अमोल सराफ | जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रिक्त पदे असून आम्हाला शिक्षक द्या या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि पालकांनी संग्रामपूर येथील शिक्षण विभागात शाळा भरविली आहे. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असा ठाम निर्णय यावेळी विद्यार्थ्यांनी घेतलं आहे.
संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथे जिल्हा परिषद शाळेवरील वर्ग १ ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. परंतु, वर्गावर एकच शिक्षक असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निरोड गावातील नागरिकांचे दैनंदिन जिवन हे शेतीवर अवलंबून आहे. त्यातच गेल्या ४-५ वर्षापासून ओल्या व कोरड्या दुष्काळाने शेतकरी शेतमजूर हवालदिल झाले आहेत. त्यामुळे निरोड गावातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यातच सध्याच्या परिस्थितीत निरोड येथे जिल्हा परिषद शाळेत १ ते ७ वी पर्यंत वर्ग असतांना सुद्धा शाळेवर केवळ एकच शिक्षक असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाख्याची असल्याने गावकरी बाहेरगावी विद्यार्थी शिकवायला पाठवू शकत नाही. त्याकरिता निरोड जिल्हा परिषद शाळेवरील रिक्त असलेल्या वर्गावर तत्काळ शिक्षक द्यावे. यासाठी आज शिक्षण विभागात ठिया देऊन शिक्षण विभागात शाळा भरविली असून जो पर्यन्त शिक्षक मिळत नाही तो पर्यन्त आम्ही जाणार नाही असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे .