
एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील वखार परिसरात मोकाट कुत्र्यांनी त्रासदायक पातळी गाठली असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कृष्णा महेंद्र पाटील या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत नागरिकांनी एरंडोल नगरपालिकेला निवेदन दिले आहे.

निवेदनात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, वॉर्ड क्रमांक ७ मध्ये कुत्रे आणि डुकरांचा संचार प्रचंड वाढलेला आहे. या प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत असून, लहान मुलं आणि वृद्ध नागरिक यांना याचा विशेष फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या कृष्णा पाटील या बालकावरील कुत्र्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेने पालिकेच्या दुर्लक्षाचा आणि अपयशाचा प्रत्यय आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय, डुकरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात संचार होत असून, त्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढत चालला आहे. हे प्राणी नाल्यांत आणि रस्त्यांवर मुक्तपणे वावरत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने या समस्येवर तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर धनंजय खैरनार, विजय नाईक, भैया पाटील, नितीन जोहरी, धनराज पाटील यांच्यासह अनेक स्थानिक रहिवाश्यांच्या स्वाक्षऱ्या असून, या मागणीस जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी कुत्र्यांपासून लहानग्यांचे संरक्षण करणे आणि डुकरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधणे, या दोन्ही गोष्टी पालिकेच्या जबाबदारीत मोडतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



