रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जून महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन दोन महिने उलटले तरी नुकसानभरपाईचा निर्णय न झाल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अन्यथा आठवडाभरानंतर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
गेल्या जून महिन्यात रावेर तालुक्यात तीन वेळा झालेल्या वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. वादळाच्या तडाख्यात केळीची झाडे जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले होते. त्यामुळे शासनाकडून लवकरच नुकसानभरपाई जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र पंचनामे होऊन सुमारे दोन महिने उलटूनही नुकसानभरपाईबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यातच पिकविमा कंपनीकडून संबंधित महसूल मंडळेही अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिकच गंभीर झाले आहे. नुकसान झालेल्या पिकाची भरपाई मिळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी रावेर तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि शासनाने गांभीर्याने पाहावे, तसेच पंचनाम्यांच्या आधारे तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की, पुढील आठवडाभरात नुकसानभरपाई मंजूर करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास रावेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निवेदनावेळी शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सुनील कोंडे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निळकंठ चौधरी, काँग्रेस शहराध्यक्ष घुमा तायडे, संतोष पाटील, शेख सलीम, सुरेश चौधरी, मोहन कचरे, यशवंत धनके, प्रताप राठोड, सुनील कोळंबे, धीरज भंगाळे, मिलिंद बोंडे, योगेश पाटील, शेख कौसर, बाळू दोडके, शेख नुरा यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



