जळगाव प्रतिनिधी | ‘एस.टी.महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ असून तरी अशी भरती तात्काळ रद्द करावी’ अशा मागणीचे निवेदन संपकरी एस.टी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिली आहे.
निवेदनात, ” मागील काही दिवसापूर्वी, ‘एस.टी. महामंडळाचे महामंडळात निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्त अशा कामगारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येणार आहे.’ अशी जाहिरात बुधवार, दि.०५ जानेवारी रोजी वर्तमानपत्रात देण्यात आली. राज्य सरकारच्या नियमानुसार सेवानिवृत्त वय हे ५८ वर्षे असून या वयानंतर माणसाची शारीरिक क्षमता कमकुवत असते. चालक हे एक फार महत्त्वाचे पद असून यामध्ये चालकाची शारीरिक क्षमता व दृष्टी महत्वाची असते.
आता हा काळ कोरोना व ओमायक्रॉन सारख्या रोगाच्या दहशतीखाली असून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस खात्यातील ५५ वर्षाच्या पुढील पोलीसांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायला दिले आहे. आणि त्याच राज्याचे परिवहन मंत्री, अनिल परब यांनी महामंडळातील सेवानिवृत्त तसेच स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना जे आता एस.टी.चालविण्याच्या दृष्टीने सक्षम नाही. अशा कामगारातील चालकांना कामगिरीवर पाठवण्याचा प्रयत्न महामंडळाचे अधिकारी करत आहे.
शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या अशा कर्मचाऱ्यांना जर बस चालवायला पाठवले तर एखादा किरकोळ किंवा गंभीर अपघात होवू शकतो. या प्रकारातून सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळ खेळला जात असून शारीरिक दृष्ट्या कमकुवत व नेत्र दृष्टी कमकुवत झालेल्या सेवानिवृत्त झालेल्या तसेच ५५ वर्षानंतर स्वेच्छा निवृत्त कामगारांची तात्पुरत्या स्वरूपात होत असलेली भरती तात्काळ रद्द करावी आणि सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ थांबवावा” अशी मागणी संपकरी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.