म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर दगड! मोठी दुर्घटना टळली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर अज्ञात व्यक्तींनी दगड ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच निदर्शनास आला आणि संभाव्य धोका टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रेल्वे कर्मचाऱ्यांना रुळांच्या मधोमध तसेच दोन्ही रुळांवर काही मोठे दगड ठेवलेले दिसले. ही बाब तातडीने नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुळांवरील दगड बाजूला केले. जर वेळीच हे दगड हटवले नसते, तर धावत्या रेल्वेगाड्यांचे मोठे नुकसान झाले असते आणि प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता.

रेल्वे रुळांवर आणि रुळांमध्ये हे दगड कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याचा तपास आता रेल्वे सुरक्षा दल (RPF) करत आहे. हा प्रकार अपघात घडवण्याच्या उद्देशाने केला गेला होता की केवळ खोडसाळपणातून, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. RPF च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली आहे.

Protected Content