ब्रेकिंग : रेल्वेमार्गाजवळ एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी एकाच कुटुंबातील तीन जणांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि सुमारे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश असून, पोलिसांनी प्राथमिक अंदाजात ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांजवळ ही भीषण घटना घडली असून, या तिघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांची पाहणी करून त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या तिघांची ओळख पटलेली नसून, ते कोणत्या गावचे आहेत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे पाचोरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या तिघांबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये असलेल्या चिमुकल्याचा मृत्यू पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Protected Content