सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील काही भागांमध्ये रात्री उशीरा जोरदार दगडफेक करण्यात आल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी काही कार्यकर्ते सुशोभीकरणाचे काम करत होते. यात शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौक या भागात अचानक अज्ञात लोकांनी जोरदार दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षणातच मोठी धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राम शिंदे, सपोनि जालींदर पळे, फैजपूरचे सपोनि निलेश वाघ, निंभोरा पोलीस स्थानकाचे सपोनि हरीदास बोचरे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तरी शहरातील वातावरण हे रात्री उशीरापर्यंत तणावपूर्ण तथापि, नियंत्रणात होते.
दरम्यान, रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सावदा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सावदा येथे रात्रीच अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून शहरात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.