दिंडोरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपचे माजी आमदार जेपी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. परंतू आता माकपने महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जेपी गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. पण ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आली होती. याला विरोध म्हणून जेपी गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतू सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवाराविरुद्ध मतदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांचा सामना महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्यासोबत होणार आहे. परंतू भाजपचा पराभव निश्चित दिसल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिपी गावित यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.