रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अजंदा व नांदूरखेडा येथे शुक्रवारी रात्री दोन ठिकाणी घरफोड्या करून चोरांनी ९० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या या घरफोड्यांमुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, तालुक्यात अजंदा येथील टिळक रूपा बिरपन हे आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर पंखा लावून झोपले असता शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लोखंडी कपाट व लोखंडी शोकेस फोडून यातील ९० हजार रोख २५ हजाराच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २५ हजार किमतीचे १० ग्राम सोन्याचे लॉकेट, २५ हजाराची मणी पोत, आठ ग्राम व दोन ग्रामच्या पादुका, ७ हजार ५०० रुपयांचे टाप्स, ३ ग्रामचे मुलांचे दागिने, ५०० रुपयांचा चायना मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार ४०० रुपयेच ऐवज लंपास केला.
त्यानंतर जवळच असलेल्या नांदूरखेडा गावातील चिंधबाई लक्मण पाटील हे घराबाहेर झोपले असता यांच्या गळ्यातील २५ हजार किमतीची सोन्याची पोत तसेच त्यांच्या जावेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची पोत चोरट्यांनी ओढून नेली. नांदूरखेड्यातून एकूण ५५ हजारांचे दागिने त्यांनी लांबवले आहेत.
चोरट्यांनी या भागात अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक दिवसांपासून दुकाने फोडल्याच्या आणि गुरे बैल चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी दोन गावात चोऱ्या केल्याने लोक भयभीत झाले आहेत. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.