खडसेंना दिलासा : ईडीच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसें यांच्यासह चौघांना ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीसीला कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे खडसेंना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय अडचणीत आले आहेत. त्यांची आधी ईडीमार्फत चौकशी झाली असून त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते. तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. यानंतर ईडीने ३१ मे २०२२ रोजी पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली होती. पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली होती.

या नोटीशीनुसार एकनाथराव खडसे यांच्यासह इतरांच्या मालकीच्या मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्तांना खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए ऍक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये टाच आणली होती. एकनाथराव खडसें यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, आणि उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत. या मालमत्ता दहा दिवसांच्या आत खाली करून द्याव्यात अशा स्वरूपाची नोटीस ईडीने बजावली होती.

ईडीच्या या नोटीशीच्या विरोधात एकनाथराव खडसे यांनी दिल्ली येथील हायकोर्टात धाव घेतली होती. येथे या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यात कोर्टाने ईडीच्या या कारवाईला स्थगिती दिली. यामुळे खडसे यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Protected Content