मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । देशात महागाईमुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाली आहेत. भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. याप्रसंगी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, “निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली. परंतु, निवडणुका संपल्यानंतर लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून १ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिल रोजी राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे.”
या आंदोलनात काँग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील” अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाना अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.