धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सार्वजनिक वाहतूक आणि शहराच्या मूलभूत सुविधांबाबत विविध मागण्या मांडत राज्याचे माजी मंत्री आणि आमदार मा. गुलाबरावजी पाटील यांना निवेदन सादर केले. प्रवासी मंडळाने लांब पल्ल्याच्या बस सेवा व्हाया धरणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या जळगाव व धुळे येथून पारोळा-एरंडोल मार्गे लांब पल्ल्याच्या बसेस धावत आहेत, मात्र त्यातील काही बसेस धरणगाव-अमळनेर मार्गे सोडाव्यात, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. यासंदर्भात पुढील पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती प्रवासी मंडळाने केली.
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तीन नवीन प्रवेशद्वारांवर धरणगावचा उल्लेख नाही. त्यामुळे या प्रवेशद्वारांवर ‘धरणगाव’चे नाव स्पष्टपणे लिहिण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जळगावहून येताना मुसळी फाट्याजवळील पुलाच्या डाव्या बाजूस धरणगाव व एरंडोलसाठी दिशादर्शक फलक (बाणा) लावावा. नवीन व्यक्ती चुकीने पुलावर चढत असल्याने हा फलक मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल.
धरणगाव ते पुणे आणि धरणगाव ते नाशिक या बसगाड्या अत्यंत खराब स्थितीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल आगार अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवले होते, मात्र अद्याप सुधारणा झालेली नाही. यावर तातडीने कारवाई करून धरणगावसाठी सुस्थितीत बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
धरणगाव-अमळनेर मार्गावर चांदणी-कुऱ्हे रेल्वे अंडरपासजवळ मोठ्या आकाराचे गतिरोधक बसवले आहेत. त्यामुळे छोट्या वाहनांना धक्का बसतो. ही गतिरोधके लहान प्रमाणात करावीत, अशी मागणी करण्यात आली. या निवेदन देतेवेळी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे पदाधिकारी एस. डब्लू. पाटील, बाबा कासार, किरण वाणी, हितेश पटेल आणि सुनील चौधरी उपस्थित होते.