मातंग समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षांपासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा मातंग समाज आणि त्याच्या बारा पोटजातींच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मदतीचा हात म्हणुन खावटी अनुदान, विज बिलात सवलत, तसेच विविध बॅंकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उचित अवधी याप्रकारच्या विविध मागण्यांसंदर्भात लहुजी शक्ती सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल यांना निवेदन देण्यात आले. 

दरम्यान, मार्च – २०१९ पासून भारत आणि पर्यायी महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पसरल्यामुळे या आजारापासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अनिल काळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, पाचोरा तालुका युवा अध्यक्ष गजानन कांबळे, श्रीराम कांबळे, सतिष बाविस्कर, राजु गायकवाड सह पदाधिकारी उपस्थित होते.

मातंग समाजातील सर्वच पोटजाती या झाडू टोपली दोरखंड तयार करून विकणे व बँडचा व्यवसायीकरण वाजंत्री वाद्य वादन इतर मजुरीची कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह भागवत असतात मात्र लॉकडाउन मुळे या सगळ्याच व्यवसायांवर मोठ्या प्रमाणामध्ये बंदी आल्यामुळे शिवाय पोट भरण्यासाठी दुसरे कुठलेही माध्यम नसल्यामुळे मातंग समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे या समाजाचं देशाच्या स्वातंत्र्य मध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान असताना देखील हा समाज आजपर्यंत उपेक्षित राहिलेला समाज आहे. या समाजातील सर्वच घटक विकासापासून आर्थिक उन्नती पासून वंचित राहिलेले आहेत म्हणूनच त्याच्या मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा कुडाच्या घरात राहणाऱ्या या समाजाला आज मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवरून हातभार लागण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दोन हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयाचा किराणामाल व इतर अन्नधान्य अशा स्वरूपाचं खावटी अनुदान दिला आहे त्याच पद्धतीने मातंग समाजाने त्यांच्या बारा पोटजाती यांनादेखील अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून किंवा इतर तत्सम माध्यमातून दोन हजार रुपये रोख रक्कम व दोन हजार रुपये पर्यंतचा किराणा व अन्नधान्य अशा पद्धतीचे अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच मातंग समाज व १२ पोट जातीतील गोर गरिबांचे वर्षभराचे विज बिल माफ करावे, विविध बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी उचित अवधी द्यावा अशा समाजोपयोगी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

Protected Content