रावेर, प्रतिनिधी । शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये. शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे आदी मागण्यांचे निवेदन कोविड – शिक्षण शुल्कनीती अभियानांतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर शाखेतर्फे विविध शैक्षणिक संस्थाना देण्यात आले.
शैक्षणिक संस्थाना राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन, रावेर विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, रावेर विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव महाजन, सावदा विद्यार्थी शहराध्यक्ष सुयोग पाटील यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. हे निवेदन श्री.व्ही.एस.नाईक कॉलेजला प्रा.चतुर गाढे, प्रा.एम.एस. पाटील, सहाय्यक बिरपण तसेच सरदार जी.जी. हायस्कूलला मुख्याध्यापक शिरीष वाणी व श्री.स्वामी समर्थ महिला महाविद्यालय यांचे संस्थाचालक डॉ.मिलिंद बिंबे यांनी स्विकारले.
निवेदनाद्वारे निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम मराठे, निशिकांत बिंबे, निखिल महाजन, ईश्वर पाटील तसेच रा.यु.कॉ. सावद्याचे नितीन पाटील, बंटी लोखंडे आदी उपस्थित होते.