जळगाव प्रतिनिधी । प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान देणे यासोबतच अपात्र शाळांची यादी लावणे आदी मागण्यासाठी नवयुग क्रांति शिक्षण संघटना व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टीईटी अन्यायग्रस्त शिक्षकांसाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत शासन स्तरावरून प्रयत्न व्हावेत, राज्यातील अघोषित प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच नैसर्गिक वाढीव तुकड्या यावरील विनाअनुदानित शिक्षकेसह गेल्या सुमारे २० वर्षांपासून विनावेतन काम करत आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. त्यामुळे वेतनासाठी शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलने केली. परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही. अपात्र शाळांची यादी जाहीर करावी, 15 नोव्हेंबर 2011 ते 24 जून 2014 च्या शासनाच्या निर्णयानुसार १०० टक्के अनुदान देण्यात यावे.
अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे, प्रस्तावित वाढीव पदांना मान्यता देऊन त्यांना अनुदान द्यावे, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह आदी मागण्यांसाठी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष निलेश वाघ, उपजिल्हाध्यक्ष दिपक माळी, कार्याध्यक्ष राकेश पाटील, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सुनंदा खरे आणि महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुनीबा शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.