लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार तोफा थंडावल्या

jalgaon raver loksabha

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या आहेत. देशात २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात एकूण १४ राज्यातील एकूण ११५ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी राज्यात १४ मतदारसंघात तर जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

 

 

तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. या प्रचाराची सांगता आज (रविवार) सायंकाळी ६ वाजता झाली आहे.

 

 

जळगाव लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे गुलाबराव देवकर,भाजप-शिवसेना महायुतीचे आमदार उन्मेष पाटील यांच्यात लढत होत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह दिग्गजांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. आज अखेरच्या दिवशी कॉंग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आल्या आहेत.

 

 

रावेर मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीच्या रक्षाताई खडसे विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे डॉ.उल्हास पाटील यांच्यात लढत होत आहे. या मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्या सभांमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन भुसावळात केले जात होते. मात्र, ऐनवेळी ती सभा काही कारणास्तव रद्द झाली होती.

 

 

रावेर व जळगाव या दोन्ही मतदार लोकसभा संघात वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे करून चुरस निर्माण केली आहे. रावेरमध्ये नितीन कांडेलकर तर जळगाव मतदार संघात अंजली बाविस्कर नशीब अजमावत आहेत. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण चांगलेच तापवलेले आहे. त्यामुळे लढत रंगतदार झाल्या आहेत.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघ

 

एकूण मतदान केंद्रे … १९६०
सहाय्यकारी मतदान केंद्रे … ५३
एकूण मतदार … १९ लाख ९ हजार ७३५
पुरुष मतदार … १० लाख १ हजार २४९
महिला मतदार … ९ लाख ८ हजार ४२७
इतर मतदार … ५९

 

रावेर लोकसभा मतदारसंघ

 

एकूण मतदान केंद्रे … १८७२
सहाय्यकारी मतदान केंद्रे … ८७
एकूण मतदार … १७ लाख ६० हजार १७५
पुरुष मतदार … ९ लाख १७ हजार ४८८
महिला मतदार … ८ लाख ४२ हजार ६६१
इतर मतदार … २६

Add Comment

Protected Content