राज्य सरकारचा केंद्राला बदनाम करण्याचा कट- दरेकर

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडी सरकार मुद्दाम लसींचा तुटवडा असल्याचे दाखवून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की,  राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नाही. 

प्रवीण दरेकर यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते. ३० लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगते. मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का, असा सवाल प्रविण दरेकर यांनी विचारला. तसेच ङ्गदूध का दूध, पानी का पानीफ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्‍वेतपत्रिका काढावी, असे आव्हान प्रविण दरेकर यांनी दिले.

या पत्रकारपरिषदेत प्रविण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावरही टीका केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी परदेशातून आलेली मदत कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना विचारावा. कतारमधून वैद्यकीय सामुग्री घेऊन एक जहाज मुंबईत आले होते. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला काय मिळालं, हा सवाल जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारावा, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Protected Content