जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत देणाऱ्या महिला सन्मान योजनेने एसटी महामंडळाला तारले असून भरघोस उत्पन्नाच्या रूपाने महामंडळाची भरभराट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या 8 महिने 14 दिवसात 2 कोटी 25 लाख 31 हजार 406 महिलांनी प्रवास केला आहे. यातून महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली “महिला सन्मान” ही योजना 17 मार्च 2023 रोजी सुरू केली. या योजनेला संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 11 डेपोंनी महिला सन्मान योजनेत भरीव कामगिरी केली आहे. जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2,25,31,406 महिलांनी एसटी प्रवास केला आहे. यातून एसटी महामंडळाला 118,62,95,690 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात महामंडळाने प्रवासभाड्या पोटी 59 कोटी 31 लाख 47 हजार 845 रूपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत.
“समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या “महिला सन्मान” योजनेमुळे एस. टी.महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यातून एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही उत्साह वृद्धींगत होत असून एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होवून एस.टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.” अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी व्यक्त केली आहे.