मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने संप मिटवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देशही औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. एसटी संपादरम्यान कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाप्रकारे अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देखील न्यायालयाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कामगार संघटनांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी उद्यापासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू केल्याची माहिती देखील समोर येत आहे.