Home उद्योग दिवाळीत एसटीची तब्बल ३०१ कोटींची कमाई ; २७ ऑक्टोबरला एका दिवसात विक्रमी...

दिवाळीत एसटीची तब्बल ३०१ कोटींची कमाई ; २७ ऑक्टोबरला एका दिवसात विक्रमी उत्पन्न


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। यंदाच्या दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तब्बल ३०१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवत राज्यभरात भरघोस कामगिरी केली आहे. पुणे विभागाने सर्वाधिक उत्पन्न मिळवत आघाडी घेतली असून त्यानंतर जळगाव आणि नाशिक विभागांचा क्रम लागतो. एसटीच्या या यशाबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

या वर्षी १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. या दहा दिवसांत एकूण ३०१ कोटींची कमाई झाली. विशेष म्हणजे, दिवाळीनंतरच्या परतीच्या प्रवासादरम्यान म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी एसटीने ३९ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून वर्षातील सर्वाधिक कमाईचा नवा विक्रम केला.

एसटीच्या एकूण ३१ विभागांपैकी पुणे विभागाने २० कोटी ४७ लाख रुपये उत्पन्नासह सर्वाधिक कामगिरी केली, तर जळगाव विभागाने १५ कोटी ६० लाख आणि नाशिक विभागाने १५ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपयांनी अधिक कमाई केली आहे, ही बाब एसटीसाठी विशेष समाधानाची ठरली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “घरापासून दूर राहून सर्वसामान्य प्रवाशांना सुखकर प्रवासाची सोय करून देणारे कर्मचारी खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद वाटत आहेत.” त्यांनी या यशाचे श्रेय एसटीच्या सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांना दिले.

तथापि, यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल व मे या दोन महिन्यांखेरीज गेल्या चार महिन्यांपासून महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत एसटीला सुमारे १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक तोटा झाला. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी हंगामात उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा होती, आणि त्यानुसार १०४९ कोटी रुपयांच्या मासिक उत्पन्नाचे लक्ष्य ठरवण्यात आले होते. परंतु काही दिवस सोडता हे लक्ष्य गाठण्यात यश आले नाही.

पुणे, बीड, अहिल्यनगर, अमरावती आणि बुलढाणा या विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली असली, तरी सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव या विभागांची कामगिरी मात्र अत्यंत सुमार राहिली. या विभागांमुळे एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. मंत्री सरनाईक यांनी या विभागांच्या कमी कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली असून, सतत तोट्यात राहणाऱ्या विभागांचे मूल्यमापन करून त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले आहेत.


Protected Content

Play sound