अतिवृष्टीत शेती बुडाली पण मदत नाही मिळाली ; वेल्हाणे खुर्दच्या शेतकऱ्यांचा तहसीलदारांकडे आक्रोश


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द गावातील शेतकरी अतिवृष्टीनंतर मदतीसाठी आजही शासनाच्या दारी फिरत आहेत. १९, २० आणि २१ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेती पाण्याखाली गेली, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, एक महिना उलटूनही ना पंचनामे झाले, ना शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा एकही रुपया जमा झाला, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वेल्हाणे खुर्द परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीत सर्वत्र पाणी साचले. तूर, कापूस, बाजरी, ज्वारीसह अनेक हंगामी पिकांचे नुकसान झाले. जवळपासच्या गावांमध्ये प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा केली असताना वेल्हाणे खुर्द मात्र दुर्लक्षित राहिले. गावातील शेतकऱ्यांनी “शासन आमच्याकडे सावत्र आईसारखं वागत आहे,” असा रोष व्यक्त करत शासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या पार्श्वभूमीवर वेल्हाणे खुर्द गावातील शेतकऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात हजेरी लावून तहसीलदार श्री. उल्हास देवरे आणि कृषी अधिकारी श्री. दिपक आहेर यांना निवेदन दिले. या निवेदनात पंचनामे तातडीने करून अतिवृष्टीची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सुदर्शन अरुण पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी मुरलीधर शामराव पाटील, रमेश झुलाल पाटील, दगडू पिरण पाटील, संदीप सदाशिव पाटील, गणेश साहेबराव पाटील, जगदीश नाना पाटील, अभिषेक ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद दिलीप पाटील, शुभम नाना पाटील आदी शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.