मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने (एसटी) दिलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. यामुळे नवीन वर्षात एसटी बसचे भाडे वाढणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे. हे भाडेवाढीचे दर आजपासून लागू करण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली. या बैठकीत १४.९५ टक्के भाडेवाढीला मान्यता दिली आहे, ज्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीबाबतही निर्णय घेण्यात आले असले तरी, त्याबाबत स्पष्टता अजून दिलेली नाही. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली, ज्यामध्ये एसटीच्या भाडेवाढीला मंजूरी देण्यात आली. एसटी महामंडळाने आपल्या तिकीट दरवाढीला मंजुरी मिळवण्यासाठी १४.९५ टक्के वाढ करण्याची मागणी केली होती, आणि ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत ३ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. यामुळे ऑटोरिक्षांचे किमान भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ रुपयांवरून ३१ रुपये होऊ शकतात.
एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्यासाठी विविध कारणांची कारणे दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या पगारांमुळे, इंधनाचे दर आणि सुट्या भागांच्या किमती वाढल्यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे होते. या साऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली. या भाडेवाढीमुळे प्रवाशांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.