फैजपूर प्रतिनिधी । येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद भागवत व कीर्तन सप्ताहाला आज ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली आहे.
या श्रीमद भागवत व कीर्तन सप्ताहचे आयोजन शहरातील शिवकॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे मंदिर परिसरात दि. ३ ते १० डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. हा कीर्तन सप्ताहाला ह.भ.प. प्रात:स्मरनिय गुरुवर्य जगन्नाथ महाराज, अंजाळेकर, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ती किशोरदासजी, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, ह.भ.प.पुंडलिक महाराज चिखकर यांच्या आशिर्वादाने प्रारंभ करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन
सुरुवातीला फैजपूर शहरातील शिवकॉलनी येथे ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी विविध गावातील भजनी मंडळ सहभागी झाले होते. दरम्यान कथा प्रवक्ते म्हणून, ह.भ.प.पुंडलिक महाराज चिखकर लाभले असून दि. ३ ते ९ डिसेंबर पर्यंत ह.भ.प.दीपक महाराज भुसावळकर, ह.भ.प.प्रभाकर महाराज कुंड मलकापूर, ह.भ.प.संजय महाराज चितोडा, ह.भ.प.निवृत्ती महाराज हरणकर, ह.भ.प.मयूर महाराज ममुराबाद, ह.भ.प.चंद्रकांत महाराज साकरीकर, ह.भ.प.गजानन महाराज, धानोरकर हे कीर्तनकार म्हणून लाभणार आहे. कथा सकाळी ९ ते ११ व दुपारी २ ते ५ अशा वेळेत होणार असून कथेची सांगता ह.भ.प.पुंडलिक महाराज चिखकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तर दि.१० रोजी दुपारी दिंडी सोहळ्या नंतर हास्यविनाचार्य ह.भ.प.विठ्ठल महाराज वाघडीकर यांचा भारुड कार्यक्रम रात्री ८ ते १० होणार आहे.
सहकार्य व आवाहन
कथा व कीर्तन सप्ताहाला शिव कॉलनी मित्र मंडळ, फैजपूर शहरातील सर्व दुर्गोत्सव व गणेश उत्सव मंडळ तसेच विरोदा, पिंपरुड, आमोदा, न्हावी, कळमोदा येथील भजनी मंडळांचे सहकार्य लाभत आहे. या श्रीमद भागवत व कीर्तन सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.