Home क्राईम भरधाव कारने दुचाकीला उडविले ; एक ठार, दोन जखमी !

भरधाव कारने दुचाकीला उडविले ; एक ठार, दोन जखमी !


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर आज, गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका इनोवा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर रॉंग साईडने (चुकीच्या बाजूने) एक दुचाकी (क्र. MP 63 ZA 6725) येत होती. या दुचाकीवर तीन जण स्वार होते. त्याच वेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारने (क्र. MH 41 C 5290) या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते तुषार बोरसे यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देत तिन्ही जखमींना मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता. मयताची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. उर्वरित दोन जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


Protected Content

Play sound