रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्यसरकारच्या मंजूरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ८० एकर जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. ५० कोटींचा प्राथमिक निधी राज्यसरकारने दिला होता. त्यानुसार शिवसृष्टी उभारणीच्या कामांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार असून, किल्ल्याचा तसेच शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास या निमित्ताने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे.
राज्यात विवीध ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टींचा अभ्यास करून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. ज्याचे सादरीकरण नुकत्याच पार पडलेल्या रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आले. यानंतर शिवसृष्टीचा आराखडा अंतिम मंजूरीसाठी राज्यसरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शिवसृष्टीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
कोकण भवन येथील आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमूख, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उपआयुक्त(नियोजन) प्रमोद केंबावी, रायगडचे उप जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, महाडचे उपविभागीय ज्ञानोबा बानापूरे, रायगड पाणी संवर्धन विभागाचे अधिक्षक अभियंता संजय शिंदे, रोहाचे सहाय्यक वनसंरक्षक रोहित चोबे, पेण-रायगड विद्यूत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संजिवनी कट्टी तसेच प्राधिकारणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पध्दतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहे बांधणे,घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.