रोटरी गतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोटरी क्लब खामगांव अंतर्गत रोटरी मानव सेवा संस्थेद्वारे संचालित रोटरी गतीमंद विद्यालयाने बुलढाणा जिल्हा समाजकल्याण विभागाद्वारे ६ मार्च २०२४ रोजी आयोजिलेल्या दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये ९ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून नेत्रदीपक कामगिरी बजावून शाळेचे नावलौकिक वाढविले आहे. वयोगट १६ ते २१ मध्ये विजय श्रीकृष्ण शेजोळे याने १०० मीटर धावणे आणि गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. याच वयोगटात नयन वसंत चोपडे याने थ्रोबॉल स्पर्धेत प्रथम तर ५० मीटर जलदगतीने चालणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला तर कु दिव्या नरेश पाटील हिने प्रथम क्रमांक मिळविला.
वयोगट २१ ते २५ मध्ये कु अपर्णा बाळकृष्ण भोंडेकर हिने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर नयन हिरालाल लोडाया याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वयोगट ८ ते १२ मध्ये निर्भय सुभाष अंभोरे याने ५० मीटर धावणे आणि स्पॉट जम्प स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याच वयोगटात कृष्णा सूर्यकांत देवताळु याने सॉफ्ट बॉल थ्रो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. वयोगट १२ ते १६ मध्ये संचित किशोर नटकुट याने स्पॉट जम्प स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याच वयोगटात सुयश राजेश शर्मा याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. अशा तऱ्हेने रोटरी गतिमंद विद्यालयाने १२ पदकांची लयलुट केलेली आहे.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरात यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्याच्या या यशामागे रोटरी मानव सेवाचे अध्यक्ष डॉ आनंद झुनझुनुवाला, विद्यालयाचे अध्यक्ष श्री दीपक अग्रवाल गाडोदिया आणि संरक्षक श्री राजीव नथाणी यांचे यकसह रोटरीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुरेश पारीक, सचिव आनंद शर्मा यांची नि:स्वार्थ सेवा असल्याचे प्रतिपादन प्राचार्या श्रीमती सरिता पाटील यांनी केलेले आहे. संपूर्ण खामगांव शहरात या विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक होत आहे.

Protected Content