नवी दिल्ली वृत्तसंस्था । डोपिंग प्रकरणी आठ महिन्याच्या बंदीनंतर पृथ्वी शॉने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीने पंजाबविरुद्ध 53 धावांची खेळी केली. बीसीसीआयने सामन्यादरम्यान पृथ्वीच्या बॅटचा एक क्लोजअप फोटो ट्विट केले आहे. हा फोटोत पृथ्वीच्या बॅटच्या मागील बाजूस एक खास संदेश लिहिलेले दिसत आहेत. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
बीसीसीआयने पृथ्वी शॉच्या बॅटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर एक संदेश लिहिला आहे. प्रिय पृथ्वी, खेळाचा आनंद घे, गुड लक. या संदेशानंतर त्याखाली ऑटोग्राफ देखील आहे. आता बीसीसीआयने हा फोटो शेअर करताना असा प्रश्न विचारला आहे की, पृथ्वी ही स्वाक्षरी आहे कोणाची? पृथ्वीच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी आहे, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींच्या मते हा संदेश आणि स्वाक्षरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आहे. तर काहींनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची असल्याचे म्हटले आहे. एका युझरने किंग कोहली असे तर दुसऱ्याने कोहली नेहमीच युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देतो. बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोवर प्रत्येक जण स्वत:ची मते मांडत आहेत.