मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलामुलींसोबत घडणाऱ्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, आज जगजीवनदास इंग्लिश स्कूलमध्ये ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस अंमलदार यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हजार ते बाराशे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्रात मोबाईलचा सुरक्षित वापर, गुड टच-बॅड टच, सायबर क्राईमपासून संरक्षण, सोशल मीडियाचा जबाबदार वापर, वाहतुकीचे नियम यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

याव्यतिरिक्त, पोलीस काका-पोलीस दीदी योजना आणि डायल ११२ या आपत्कालीन सेवांचा वापर कसा करावा, याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच, वाईट मार्गाचा अवलंब न करणे, गुरुजनांचा आदर करणे आणि अल्पवयात लग्न न करणे यांसारख्या सामाजिक आणि नैतिक मूल्यांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षेसाठी असे उपक्रम सातत्याने राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.



