
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शासकीय हमी खरेदी केंद्रांवर बनावट सातबारा उतारे व खोटी लागवड नोंद सादर करून ज्वारी विक्री केल्याचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करून १३३ व्यापाऱ्यांनी शासनाची सुमारे १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात संबंधित व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनातर्फे विविध कृषी उत्पन्नाची खरेदी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून ज्वारीची हमीभावाने खरेदी करण्यात आली होती. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत काही व्यापाऱ्यांनी स्वतःला शेतकरी दाखवत बनावट सातबारा उतारे सादर केले. तसेच प्रत्यक्षात ज्वारीची लागवड न केलेली असतानाही खोट्या नोंदी दाखवून ज्वारी विक्री केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला आहे.
जिल्ह्यातील रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा आणि शेंदुर्णी या पाच शासकीय खरेदी केंद्रांवर हा प्रकार घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या पाच केंद्रांवर एकूण ४ हजार ७१२ क्विंटल ज्वारी विक्री दाखवून शासनाकडून १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांची रक्कम घेण्यात आली आहे. यामध्ये रावेर येथे ३१ व्यापारी, जामनेर येथे १४, मुक्ताईनगर येथे ५९, चोपडा येथे १४ आणि शेंदुर्णी येथे १५ अशा एकूण १३३ व्यापाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या गैरप्रकाराची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यामुळे संबंधित सर्व व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून प्रकरण मिटवण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
दरम्यान शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर दिशाभूल करून ज्वारी विक्री केल्याचा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाने मुक्ताईनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणानंतर विशेषतः रावेर खरेदी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या ३१ व्यापाऱ्यांची नावे कोणती याबाबत तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. काही व्यापारी शुक्रवारी तहसील कार्यालयात दिसून आल्याने या प्रकरणाला आणखी वेग आला आहे. जिल्ह्यातील हमी खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



