लवकरच मुक्ताईनगर आगारात नव्या एस.टी. बसेस दाखल होणार : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लवकरच मुक्ताईनगर एस.टी. आगारात नव्या बसेस दाखल होणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा समावेश असलेला विस्तीर्ण भाग आहे. येथे असलेल्या ८३ गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी मुक्ताईनगर शहरात येतात. तसेच, हे संत मुक्ताबाईंचे कर्मभूमी असलेले धार्मिक शहर असल्याने येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

सध्या मुक्ताईनगर एस.टी. आगारात ४८ बसेस असून त्यातील केवळ ४२ बसेस प्रवासी सेवेत आहेत. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवास करता येत नाही, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसफेऱ्यांची कमतरता मोठी समस्या ठरली आहे.

या समस्येची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच एस.टी. आगारात नव्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी, तसेच भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अधिक बसफेऱ्या वाढवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत आहे.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळ्याशिवाय सुरू राहावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. लवकरच नव्या बसेस मुक्ताईनगर आगारात दाखल होतील, ज्यामुळे प्रवासाची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटेल. जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष कायम राहील!” या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रवाशांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि आ.पाटील कार्यरत आहेत.

Protected Content