जळगाव/चाळीसगाव प्रतिनिधी । ट्रू जेट कंपनीला नागरी उड्डयन प्राधिकरण म्हणजे डीजीसीए कडून सर्व परवानग्या मिळाल्याने येत्या एक ऑगस्टपासून जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.
याबाबत वृत्त असे की, ट्रू जेट कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डीजीसीएच्या संचालकांसोबत अलीकडेच मुंबईत बैठक झाली या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जळगाव ते पुणे जळगाव ते मुंबई व जळगाव ते अहमदाबाद या सेवांबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय, खासदार उन्मेष पाटील यांनी संसदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. यात त्यांनी जळगांव विमान तळा वरून मागील सेवा पुरवणारी डेक्कन कंपनीने पूर्वसूचना देता सेवा बंद केली आहे. असे नागरी उड्डयन मंत्र्यांचे निदर्शनास आणून दिले. यावर नागरी उड्डयण मंत्री के.एस. पुरी यांनी नागरी उड्डायन मंत्रालयाकडे तसे धोरण नसल्याचे स्पष्ट करून यासाठी लवकरच ते काय धोरण काय करता येईल असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी या विमानसेवेला अनुकुलता दर्शविली आहे. यामुळे आता जळगावच्या विमानसेवाला मुहुर्त लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १ ऑगस्टपासून नियमित विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.