‘त्या’ सावित्रीच्या लेकीला सोनू सूद करणार मदत !

मुंबई । ऑनलाईन शिक्षणासाठी डोंगरावर झोपडी बांधणार्‍या स्वप्नाली सुतार या विद्यार्थीनीच्या मदतीसाठी आता अभिनेते सोनू सुद सरसावला आहे.

अनेकांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद आता सिंधुदुर्गच्या स्वप्नालीलाही मदत करण्यासाठी सरसावला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन क्लासला हजेरी लावण्यासाठी स्वप्नालीची जिद्द आणि तळमळ पाहून सोनुने मदत करण्यासाठी तिचे डिटेल्स मागवले आहेत.

कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे शाळा सुरू आहेत. मात्र, दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या अनुषंगाने मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे.

कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात इंटरनेटचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत होती, कॉलेजचे ऑनलाईन लेक्चरही बुडत होते. त्यामुळे स्वप्नालीने गावातील एका डोंगरावर जाऊन अभ्यास करण्याचं निश्‍चित केले. भर पावसात फक्त एका झोपडीच्या आडोशाला ती कॉलेजच्या ऑनलाईन क्लासला हजेरी लावते. सोनालीच्या या जिद्दीची कहाणी डॉ. किरण डेरले यांनी शेअर करुन सोनू सूदकडे मदतीची मागणी केली होती. सोनूने या ट्विटला रिप्लाय देत, स्वप्नालीचे डिटेल्स मागवले आहेत. तसेच, तिच्या गावात वाय-फाय पोहोचविण्याचं आश्‍वासनही सोनूनं दिलंय.

Protected Content