एमपीएससी परीक्षेत सोलापुरकरांचा डंका !

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. १८) संध्याकाळी जाहीर करण्यात आली असून, या परीक्षेत सोलापूर  जिल्ह्यातील सुपुत्रांनी घवघववीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षी ६२३ पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार पदांचा समावेश होता. या परीक्षेत माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीमधील शेतकरी कुटुंबातील नीतेश कदम हे ३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून, याअगोदर सलग चारवेळा ते एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. सध्या ते सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून कार्यरत आहे.

तर, याच गावातील प्रशांत उबाळे हे २२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले आहे. जवळच असलेल्या बुद्रुकवाडी येथील जगदीश दळवी यांनी सलग दुसऱ्या वर्षी या परीक्षेत यश संपादन केले असून, १०५ व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

बार्शीच्या सासुरे येथील अंकिता ताकभाते यांनी राज्यात मुलींमध्ये ३ रा क्रमांक पटकावित १४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बार्शी शहरातील रोनक माळवदकर हे ९६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या सहाय्यक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. सुर्डीचे सुपुत्र अक्षय काळे हे १६८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत राज्यात ४ था तर सहाय्यक कक्षा अधिकारी या परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. पानगावचे सुपुत्र प्रदीप काळे हे २५४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

मंगळवेढ्याचे रोहित भगिरे यांनी अभ्यासात सातत्य ठेवत सलग दुसऱ्या वर्षी यशाला गवसणी घालत २२ व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते उपनिबंधक सहकार्यकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सांगोला तालुक्यातील बामणी गावचे सुपुत्र भारत पांढरे हे ७८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
या शिवाय, कोळे गावचे सुपुत्र विलास कोळेकर हे १११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते उपनिबंधक सहकारी संस्था येथे कार्यरत आहेत. जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते, अशी प्रतिक्रिया या यशस्वी विद्यार्थ्यांनी दिली आहे. या सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, या सुपुत्रांनी पुन्हा एकदा सोलापूरचा झेंडा एमपीएससीत रोवला आहे.

Protected Content