मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशा शब्दात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.
पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरले जात आहे. परिणामी नवे सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे. याच पार्श्वभूमिकेवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.