जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख १४ हजार जणांना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 नागरीकांना दुसरा डोस असे एकूण 4 लाख 13 हजार 943 लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे.  जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर असून 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली आहे. नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात 167 लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पैकी सर्वाधिक 1 लाख 12 हजार 948 नागरीकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे तर 39 हजार 896 नागरीकांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.       

Protected Content