साप, समाज आणि सर्पमित्र….!

sneck friend

शहादा – साप दिसला की, अनेकांच्या मनात प्रचंड प्रमाणात भीती निर्माण होते. त्याचे कारणही तेवढेच खरे आहे. कारण पूर्वी पासूनच आपल्या समाजात सापांबद्दल अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा व गैरसमज पसरत आलेल्या आहेत. अलीकडच्या काळात सर्पमित्रांच्या कामामुळे कदाचित सापांबद्दल समाजातील गैरसमज व अंधश्रद्धा कमी होण्यास मदत होत आहे. पूर्वी नागपंचमी आली की, शहरात व ग्रामीण भागात नाग घेऊन गारुडी फिरत असताना आपल्याला दिसत होते. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे ते चित्र सध्या दिसत नाही, हीच खरी सर्पमित्रांची कामाची पावती आहे.

 

पूर्वी ग्रामीण भागात शहरात साप दिसला की, आठ- दहा जण हातात लाठ्या-काठ्या घेऊन सापाला ठेचून मारत असत आणि काही ठिकाणी अजूनही तसेच घडत असते. त्यामुळे सापांच्या अनेक जाती लुप्त झालेल्या दिसत आहेत. अलीकडच्या काळात ठिकठिकाणी सर्पमित्रांचा जनसंपर्क वाढल्यामुळे सध्या साप मारण्याचे प्रमाण कमी होत आहे. साप हा अन्न साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे.साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखला जातो.म्हणून साप वाचवणे ही काळाची गरज आहे, जंगलतोड व वाढत्या शहरीकरणामुळे सापांना रहायला जागा ,खायला अन्न मिळत नाही, म्हणूनच कदाचित साप अन्नाच्या शोधात लोकांच्या घरात प्रवेश करत असतात. इथूनच सुरु होतो खरा सर्पमित्राचा प्रवास, प्राण्यांविषयी प्रेम, निसर्गाची आवड असणाऱ्या आणि धाडसी वृत्ती अंगी असणारा व्यक्ती सर्पमित्र म्हणून काम करू शकतो. सर्पमित्राला कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा शासनाचे ओळखपत्र नसते तरीदेखील स्वतःच्या जबाबदारीने आवडीने व सामाजिक जाणीवेतून सर्पमित्र हे काम करत असतात. त्यात साप पकडणे, हे काम पूर्णवेळ करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कॉलेज, नोकरी, व्यवसाय सांभाळून आवडीतून निर्माण झालेल्या या छंदाकडे गांभीर्याने पाहिले जाते का ? या प्रश्नाचे अद्यापही ठाम उत्तर मिळत नाही. साप पकडणे हे सोपे काम नाही. हे खरे आहे, त्यासाठी धोका पत्कारावा लागतो. या बाबत शंका नाही मात्र धोका पत्करून हे काम पूर्णत्वास येत नाही. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि वारंवार केला जाणारा सराव यांची गरज असते. सध्या या छंदाकडे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम म्हणूनही पाहिले जात आहे. सोशल नेटवर्किंग साईटसवर हातात साप घेऊन काढलेले फोटो पाहिले की, अनेकांना या कामाबद्दल प्रश्न पडतो, हे स्वाभाविक आहे. या कामामुळे स्वतःचा जीव देखील गमवावा लागू शकतो, हे ही लक्षात घेण्याची आज गरज आहे. या क्षेत्रात शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन काम करण्यावर भर द्यावा. सर्पमित्र ही शहराची व ग्रामीण भागाची गरज आहे. त्यासाठी अनेक सर्पमित्रांकडून प्रामाणिक व नि:स्वार्थीपणे काम सुरू आहे, याबाबत शंका नाही. काही वेळेस समाजाकडूनही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्पमित्रांना हीन दर्जाची वागणूक मिळत असते. प्रत्यक्ष कामावर असणाऱ्या सर्पमित्रांना अनेक प्रकारच्या समस्यांना किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागत असते.

सर्पमित्र आणि गारुडी यामध्ये जो फरक आहे, तो आज समाजाने समजून घेण्याची गरज आहे. गारुडी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साप जवळ बाळगतात, मात्र सर्पमित्रास त्याची परवानगी नाही. कारण आर्थिक फायद्यासाठी साप जवळ बाळगण्याची परवानगी कुणासही नसते. अनेक सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्यांना आपल्याजवळ बाळगताना दिसून येतात. विनापरवाना सापांचे सादरीकरण करणे, फोटो काढणे किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे प्रकार घडत आहेत. पुरेसे ज्ञान आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याने असे प्रकार घडून येत असल्याने दिसून येते. या सगळ्या प्रकारांमध्ये वनविभागाची भूमिका महत्वाची आहे.
आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा असूनही समाजात वन्यजीवांना मारण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि नुकताच आपण २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून संपूर्ण जगभरात सोशल मीडियाच्या आधारे मोठया प्रमाणात साजरा केला. पण लगेच काही दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला, त्यात २० ते २५ लोक निर्घृणपणे एका वाघिणीला मारताना दिसून येत होते. म्हणजे एकीकडे ‘जागतिक व्याघ्र दिवस’ साजरा करण्याचे ढोंग करायचे आणि दुसरीकडे बिनधास्तपणे वन्यप्राण्यांना मारायचे, असले प्रकार सर्वत्र सुरु आहेत.

आता काही दिवसांपूर्वी एका सर्पमित्राला अनुभवायला मिळालेली घटना म्हणजे, एका अनोळखी व्यक्तीने साप पकडण्यासाठी त्याला कॉल केला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचण्याला थोडा उशिर झाल्याने, त्यांनी सापाला मारून टाकले होते. अशावेळी सर्पमित्र मात्र केवळ सदर व्यक्तीची समजूत काढू शकतो, कायदाचा धाक दाखवू शकत नाही. नागपंचमी साजरी करतांना एकीकडे सापांची पूजा करायची आणि दुसरीकडे त्यांची हत्त्या करायची, समाजाची हीच मानसिकता आज बदलण्याची गरज आहे. तरच वन्यजीव प्राण्याचे संरक्षण करता येईल. खर म्हणजे आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा असूनही समाजामधून बिनधास्तपणे वन्यजीव प्राण्यांना मारण्यात येत आहे. कायद्याचा जराही धाक राहिलेला नाही म्हणून आज गरज आहे ती समाजाला वन्यजीव संरक्षण कायद्याची आठवण करून देण्याची. तरच समाजामधील हे वन्यजीव प्राण्यांविषयी द्वेषाचे विदारक चित्र बदलण्यास मदत होईल.

– प्रवीण महिरे,                                                                                                                                                                                                                    सर्पमित्र, शहादा, 
  मो. 9503997254.

Protected Content