मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय महिला क्रिकेटची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने दिग्दर्शक व अभिनेता पलाश मुच्छलसोबतचे लग्न रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर क्रीडाविश्वात आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवरून केलेल्या पोस्टमध्ये तिने हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे स्पष्ट केले असून, यानंतर पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाहाची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यांचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते; मात्र स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने समारंभ पुढे ढकलण्यात आला. यानंतर अचानक हे लग्न पूर्णपणे रद्द झाल्याची माहिती स्मृतीने दिली. पलाशच्या एका मुलीसोबतच्या कथित चॅटचे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतरच हा निर्णय घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्मृतीने ‘लग्न रद्द झाले आहे आणि आता आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे,’ असे म्हणत चाहत्यांना परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले. तसेच, “मी क्रिकेट खेळणं सोडलेलं नाही. भारतासाठी मला आणखी अनेक ट्रॉफी जिंकायच्या आहेत,” असे म्हणत तिने क्रीडा कारकिर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
विशेष म्हणजे, लग्न रद्द झाल्यानंतरही स्मृतीने पलाश आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आदर व्यक्त करत सर्वांकडे एक विनंती केली आहे. तिने म्हटले, “हा विषय आता इथेच संपवूया. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करा. आम्हाला सर्वांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी थोडी शांतता आणि प्रायव्हसी गरजेची आहे.” तिच्या या भावनिक आवाहनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
काही दिवस शांत असलेला हा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चाहते आणि क्रीडाप्रेमींना मात्र आता स्मृतीच्या आगामी सामन्यांतील कामगिरीकडे आणि तिच्या आयुष्यातील पुढील निर्णयांकडे उत्सुकता आहे.



