Home उद्योग  जैन इरिगेशनला ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ राष्ट्रीय पुरस्कार

 जैन इरिगेशनला ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ राष्ट्रीय पुरस्कार


जळगाव/तिरुचिरापल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या सुप्रसिद्ध जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ हा अत्यंत प्रतिष्ठित आणि गौरवास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला. केळी उत्पादन क्षेत्रात नवकल्पनांद्वारे मोठा बदल घडवून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट फुलवणाऱ्या या कंपनीच्या कार्याची ही अधिकृत दखल आहे.

तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे २१ ऑगस्ट १९९३ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च बंगलोरचे संचालक तुषार कांती बेहरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कंपनीच्या वतीने केळी विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील आणि टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ कोयंबतूरचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल रिसर्च इन्स्टिटयूट ऑन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. थंगवेलू आणि तामिळनाडू आदिवासी विभागाचे संचालक श्री. एस. अण्णादुराई हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. सेल्व्हराजन यांनी जैन इरिगेशन कंपनीच्या टिश्यूकल्चरद्वारे निर्मित दर्जेदार, रोगमुक्त आणि अत्यंत उत्पादनक्षम केळी रोपांमुळे देशातील केळी उत्पादन व निर्यातीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी ज्या स्वप्नांमध्ये खानदेशातील केळी परदेशात पोहोचावी, असा विचार केला होता, तो आज जैन इरिगेशनच्या सततच्या संशोधन व प्रयत्नांमुळे साकार झाला आहे.

हा पुरस्कार म्हणजे फक्त कंपनीचा गौरव नसून, त्यावर विश्वास ठेवून मेहनतीने शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान आहे, असे मत डॉ. के. बी. पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी हा पुरस्कार देशभरातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना समर्पित केल्याचे नमूद करत, त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

जैन इरिगेशनच्या संशोधनपर कार्यामुळे भारताची ओळख केळी उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या देशांमध्ये झाली आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ कंपनीच्या नवोन्मेषी दृष्टिकोनाची पावती नसून, भारतीय कृषीक्षेत्रात आधुनिकतेचा यशस्वी प्रवाह निर्माण करणाऱ्या प्रयत्नांचे फलित आहे.


Protected Content

Play sound