पारोळा येथे २० रोजी भव्य गजानन महाराज पालखी सोहळा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील बहिरम गल्ली येथील गजानन महाराज मंदिराच्या वतीने २० फेब्रुवारी, गुरुवारी, भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त युवा विश्व सोशल ग्रुप आणि गजानन महाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी मंदिरात महाराजांच्या मूर्तींचे अभिषेक व आरती करून पालखी मार्गस्थ होईल. पालखीचे मार्गक्रमण बहिरम गल्लीतील काळभैरव मंदिर व श्री गजानन मंदिरापासून सुरू होऊन हत्ती गल्ली, आझाद चौक, मडक्या मारोती चौक, सांई मंदिर, मोरफळ गल्ली, राधाकृष्ण मंदिर, रथ गल्ली, क्रांती चौक, बालाजी मंदिर, न्हावी गल्ली, लष्कर गल्ली मार्गे राम मंदिरापर्यंत पोहोचेल. दुपारी राम मंदिरात महाभिषेक व पूजा करून विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पालखीची सहवाद्य, भव्य व दिव्य शोभायात्रा काढण्यात येईल.

शोभायात्रेचा मार्ग श्रीराम मंदिर, कासार गल्ली, गणपती चौक, रथ चौक, गावहोळी चौक, क्रांती चौक, जडे गल्ली मार्गे बहिरम गल्लीतील मंदिरापर्यंत असणार आहे. यावेळी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन गजानन महाराज मंदिर संस्थान, युवा विश्व सोशल ग्रुप, गजानन मित्र मंडळ, काळभैरव मंदिर मित्र मंडळ, गजानन महाराज महिला मंडळ व श्री छोटे श्रीराम मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा पालखी सोहळा श्री गजानन महाराज यांच्या भक्तांसाठी एक आध्यात्मिक आणि भावनिक अनुभव देणारा ठरणार आहे.

Protected Content