जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप होत असल्याने त्यांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याचे प्रकरण खूप गाजत आहे. यात शिवसेना-उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे एका कार्यक्रमात सलीम कुत्ता याच्यासोबत नृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरूनच आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशी करण्याची विधानसभेत मागणी केली. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यात सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजन हे देखील सलीम कुत्ता याच्या सोबत कार्यक्रमात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आता याच मुद्यावरून आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना आ. एकनाथ खडसे म्हणाले की, ”मी मंत्री असतांना माझ्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. तेव्हा पक्षाने मला तात्काळ राजीनामा देऊन चौकशी केली. मात्र आता गिरीश महाजन यांच्यावर हाच आरोप होत असतांनाही त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच हा अतिशय गंभीर प्रकार असून राज्य सरकारने या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करून याच्या माध्यमातून सखोल चौकशी करत सत्य समोर आणावे अशी मागणी देखील एकनाथराव खडसे यांनी केली आहे.