महिला दिनी एकल माता पालकांचा सन्मानपत्रासह सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकल माता पालकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे (संचालिका, के.सी.ई. सोसायटी जळगाव), पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष निरंजन वाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली.

सौ. रत्नमाला शिंदे यांनी मानपत्राचे वाचन व कविता सादर करून स्त्रीशक्तीचा जागर घडवला, तर सौ. मनिषा जयकर यांनी ‘आई’चे महत्त्व दर्शवणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली.

यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी महिलांना प्रेरणादायी संदेश देत सांगितले की, “आयुष्यात येणाऱ्या संकटांवर सकारात्मक विचारसरणीने मात करा. आपल्या मुलांना आदर्श नागरिक बनवा. गृहिणी नव्हे तर गृहनिर्माते बना. स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्या आणि समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करा.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.ए. पाटील, निर्मल चतुर, रफिक तडवी, सौ. मनिषा जयकर, सौ. रत्नमाला शिंदे, सौ. मंगल गोठवाल, अनिल शिवदे, चंदन खरे, शुभम तायडे, तुषार सोनवणे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content